माणूस म्हणून जगतांना आवश्यक असणारी जीवन कौशल्ये कोणती?*
*जीवन कौशल्ये-*
*१) स्वजागृती-*
प्रत्येक माणसाला स्वतःच्या क्षमता, मर्यादा, आवडी-निवडी, आकांक्षा, जीवन ध्येय हे ओळखताच यायला हवे! अन्यथा जो स्वतःलाही ओळखू शकत नाही, तो इतरांना कसे ओळखणार?*२) समानुभूती-*
आपण नेहेमी इतरांचे दोष शोधतो, पण पाण्यामध्ये मासा, झोप घेतो कैसा; जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे या उक्तीनुसार दुस-यांच्या भूमिकेत शिरुन, त्यांच्या जागी आपण असतो तर काय केले असते हा विचार करण्याचे हे कौशल्य आपल्यात हवेच!
*३) समस्या निराकरण-*
जेव्हा आपल्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध असतील, त्यावेळी हे करु की ते करु अशी स्वतःची अवस्था होवू न देता, उपलब्ध पर्यायांतून योग्य व संभाव्य पर्याय निवडून त्याची अंमलबजावणी करण्याचे हे कौशल्यही अतिमहत्वाचे आहे!*४) निर्णय घेणे-*
आपण जे बोलतो, विचार वा कृती करतो; ते करण्यार्वीच परिणामांचा विचार करावा आणि ज्याचे परिणाम चांगले होतील, असेच बोलावे, विचार वा कृती करणे यालाच विधायक निर्णय क्षमतेचे कौशल्य म्हणतात, जे दैनंदिन जीवनात आवश्यकच आहे!*५) प्रभावी संवाद कौशल्य-*
आपली भाषा व कायिक हालचाली समृद्ध करुन आपले विचार हे शाब्दिक वा अशाब्दिक माध्यमांतून प्रभावीपणे मांडण्याचे हे कौशल्य आहे. खासकरुन आपण कुटुंबात वा समाजात वावरतांना या कौशल्याची नितांत गरज असते!
*६) वैज्ञानिक दृष्टिकोन वा चिकित्सक विचारप्रक्रिया-*
केवळ बाबा वाक्यम् प्रमाणम् असे वर्तन न ठेवता, प्रत्येक बाबीमागील कार्यकारणभाव समजून घेवून, उपलब्ध माहितीचे विश्लेषण व परिक्षण वस्तुनिष्ठ पध्दतीने करण्याचे हे कौशल्यही महत्वाचेच! यात पूर्वग्रहदूषितपणाला वाव दिला जात नाही, गैरसमज ही होत नाहीत.*७) सर्जनशील वा नवनिर्मिती कौशल्य-*
आपण आजवर जे शिक्षण वा अनुभव घेतलेत, त्यांचा प्रत्यक्ष वापर करुन; आजवर जे कोणीही केलेच नाही, ते करण्याची वा नवनिर्मिती करण्याचे हे कौशल्य! मात्र या नवनिर्मितीतून मानवाचे कल्याण होईल, मानवाचा सर्वनाश होणार नाही याचा विचार होणेही तितकेच महत्वाचे!*८) आंतरव्यक्ती संबंध-*
आपल्या कुटुंबात, समाजात आपल्याशी संबंधित जेवढेही लोक असतील, त्यांचा स्वभाव ओळखून त्यांच्याशी नम्रतेने निर्भेळ व स्नेहपूर्ण संबंध राखण्याचे हे कौशल्य आपल्या जीवनातील कटूता कायमची दुर करते!
*९) भावनांचे समायोजन-*
आपल्याला जशा भावना आहेत, तशाच भावना इतरांनाही आहेत हे लक्षात घेवून; संयमाने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत, इतरांच्या भावनेची कदर करायला शिकविणारे हे कौशल्यही जीवनात आवश्यकच!*१०) ताण-तणावांचे समायोजन-*
आज ज्याच्या मनाविरुध्द घडले वा सहनशक्तीच्या अभावामुळे जो तो उठतो, आणि एकतर भांडण, मारामारी, हत्या वा आत्महत्या करतो! मात्र संयमाने सहनशक्ती वाढवित जावून ताण-तणावांची कारणे शोधणे, त्या कारणांचा शारिरीक, मानसिक, कौटुंबिक व सामाजिक परिणाम लक्षात घेवून ताण-तणाव देणारी कारणे संपुष्टात आणण्याचे हे कौशल्य आपल्याला धकाधकीच्या युगातही माणूस म्हणूनच जगण्याचे व वागण्याचे बळ देते!
आता आपल्या लक्षात आलेच असेल की, माणूस म्हणून जगतांना केवळ संस्कृती, संस्कार व माणूसकी या बाबीच महत्वाच्या नसून माणूस म्हणून जगण्या-वागण्याची उर्जा देणारी ही दहाही कौशल्ये आपल्या प्रत्येकांत असणे आवश्यकच आहे!

0 टिप्पण्या